
अमळनेर – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिमनपुरी पिंपळे येथे ८ मार्च रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेची धुरा जिल्हा महिला समन्वय सरपंच परिषद मुबंई प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी सांभाळली. व्यासपीठावर भारती पाटील, विजया पाटील, श्रध्दा पाटील,रेखा पाटील यांची उपस्थिती विशेष होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. महिलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे अनेक महिलांनी वाचनालयात येऊन विविध पुस्तकांची माहिती घेतली. महिला सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सौ वर्षा पाटील यांनी उपस्थित महिलांना समाजातील वास्तव व आई म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांच्या कर्तव्ये आणि अधिकारांचा उल्लेख करून महिलांना समजून घेण्यास प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या मार्फत शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मातांचा व भगिनींचा सत्कार करण्यात आला तसेच हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा केला गेला. उपस्थित सर्व महिलांना भेट वस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. सूत्रसंचालन भारती मॅडम यांनी केले. श्रद्धा पाटील यांनी आभार व्यक्त केले.




