
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संयुक्त बैठकीत दिले निर्देश…
अमळनेर : पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार आणि कामगार यांच्यात वेतन ,पी एफ आणि सुविधा याबाबत सुरू असलेल्या वादाबाबत दोन्ही पक्षांनी सन्माननीय तोडगा काढावा असे निर्देश मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संयुक्त बैठकीत दिले.

घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने २०२२ पासून कामगारांना पी एफ दिलेला नाही , किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देत नाही , वेतन बँक खात्यावर न देता साध्या वहीवर पेन्सिलीने रक्कम लिहून पगार देतो आणि नन्तर खोडून टाकतो. पी एफ दुसऱ्याच्याच नावाने जमा होतो , कामगारांना आरोग्यसाठी लागणारे किट देत नाही असे अनेक आरोप करत मेहुल बिऱ्हाडे यांनी कामगारांची बाजू मांडली. तर ठेकेदार पवार आणि मुकादम खलील शहा यांनी सांगितले की कामगारांनीच आम्हाला पी एफ रोखीने द्यायला सांगितला होता,कामगार तीनच तास काम करतात , मी कमी दराने ठेका भरला आहे चार वर्षांपासून मुदत वाढवून मला त्याच दराने काम करायला लावत आहेत. माझे बिल अडकले आहे तरी मी नियमित वेतन करतो असा प्रश्न मांडला. यावर कामगार आक्रमक होत कराराप्रमाणे किमान वेतन , खात्यावर वेतन जमा झाले पाहिजे व २०२२ पासून पी एफ जमा झाला पाहिजे अशी मागणी केली. यावर दोन्ही पक्षांची समजूत घालून मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सामंजस्याने तोडगा काढावा दोघांनी दोन दोन पावले सरकावीत आणि शहराला वेठीस धरू नये अन्यथा कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असा कडक इशारा दिल्यानन्तर दोन्ही गटांनी एकत्र चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीस आरोग्य निरीक्षक किरण कंडारे , आरोग्य निरीक्षक संतोष जाधव ,घनकचरा ठेकेदार व कामगार हजर होते.




