
अमळनेर : तालुक्यातील पिंपळे येथे भीमराव नारायण पाटील यांच्या गव्हाच्या शेताला शॉर्ट सर्किट ने आग लागून उत्पन्नावर आलेला गहू आणि ठिबक नळ्या आदी साहित्य जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.

पिंपळे येथे भीमराव नारायण पाटील यांच्या शेतात ट्रान्सफॉर्मर असून डीपी मध्ये पक्षी घुसल्याने शॉर्ट सर्किट झाले आणि उभ्या गव्हाच्या पिकावर ठिणगी पडल्याने आग संपूर्ण शेतात पसरू लागली. अग्निशमन दलाला बोलावण्यासाठी गावकऱ्यांनी पालिकेला कळवले असता पालिकेने आधी पोलिसात तक्रार करा असे सांगितले. तोपर्यंत शेतात आग वाढत चालली होती. गावातील श्याम पाटील , भीमराव पाटील , सुनील पाटील ,नारायण पाटील ,दीपक पाटील , दिनेश पाटील ,प्रकाश पाटील , यांच्यासह गावातील शेतकरी व तरुणानी आजूबाजूच्या शेतातल्या ओल्या मक्याची व बाजरीची तोटे घेऊन झोडपणे सुरू केले. बऱ्याच वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांना यश आले. तोपर्यंत दिनेश पाटील यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कळवल्यानंतर मुख्याधिकरी गणेश शिंदे यांनी गणेश गोसावी याना पाठवून अग्निशमन बंम्ब उशिरा पोहचला. मात्र शेतातले तापमान आणि ठिणग्या शिल्लक राहू नये म्हणून अग्निशमन दलाचे आकाश बाविस्कर,फारूख शेख यांनी पाणी मारून शेत ओले केले त्यामुळे धोका टळला.




