
आर के फुड्सला कारणे दाखवा नोटिस, उत्तर आल्यावर दंडात्मक कारवाई, गुन्हा दाखल नाही
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील आर के फूड्स मधील शेतकऱ्यांच्या मालाच्या वजनात आढळलेल्या तफावतीबाबत बाजार समितीच्या वांधा समितीने ४२ शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत त्यांना न्याय मिळवून देत संबंधित व्यापाऱ्याकडून तफावतीचा मोबदला मिळवून दिला आहे.

१० मार्च रोजी मंगरूळ येथील आर के फूड्स कंपनीत शेतकऱ्यांच्या गव्हाच्या वजनात मोठी तफावत आढळून आल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार केली होती. योगेश ट्रेडर्स चे मालक योगेश वाणी यांनी हा गहू खरेदी केला होता. तात्काळ पंचनामा करून वजनमाप निरीक्षकाकडे तक्रार केली होती. पंचनामे केल्यानन्तर १० रोजी तफावत आढळलेल्या तीन शेतकऱ्यांना ११ रोजीच मोबदला देण्यात आला होता. मात्र ४२ शेतकऱ्यांनी याबाबत आमच्याही मालाचे वजन कमी दाखवून संबंधित व्यापाऱ्याने लूट केल्याची तक्रार केली होती. त्याबाबत निर्णय झालेला नव्हता. या शेतकऱ्यांना पुन्हा १७ रोजी तक्रारदार शेतकऱ्यांना बोलावून वांधा कमिटीचे सदस्य सभापती अशोक पाटील , उपसभापती सुरेश पाटील , प्रा सुभाष पाटील, समाधान धनगर ,हिरालाल पाटील , प्रकाश वाणी ,ऋषभ पारख आणि व्यापारी योगेश वाणी, सचिव डॉ उन्मेश राठोड , प्रशांत नेरकर यांनी प्रत्यक्ष आर के फूड्स मध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज , खरेदी पावत्या , प्लेट काटा रिपोर्ट , क्रॉस चौकशी म्हणून ट्रॅक्टर चे इतरत्र वजन करून खात्री केली. यात साधारणपणे २ ते १० क्विंटल ची तफावत आढळून आली. लागलीच योगेश वाणी याना सूचना देऊन शेतकऱ्यांना तफावत वजनाचा मोबदला देण्यात आला.
प्रतिक्रिया…
तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या समक्ष पारदर्शीपणा दाखवून मोबदला देण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल- अशोक पाटील ,सभापती , कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर
प्रतिक्रिया…
बाजार समितीने वजनात तफावत बाबत चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. तो अधिकार बाजार समितीला आहे. शेतकऱ्यांचे जबाब घेऊन फसवणूक व आर्थिक घोटाळा झाला असल्यास तशी फिर्याद पोलिसात दिल्यास नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल.- दत्तात्रय निकम , पोलीस निरीक्षक अमळनेर
प्रतिक्रिया…
वजनकाट्यात तफावत आढळल्याने तो तातडीने बंद करून आर के फुड्सला कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. त्यांचे उत्तर आठ दिवसात आल्यावर दंडात्मक कारवाई करून रीतसर वजनकाटा दुरुस्त करण्यात येईल. – कुमारसिंग राजपूत , वजनमाप निरीक्षक अमळनेर




