
अमळनेर : हिंदू नववर्ष (गुढीपाडवा) निमित्त येथे हिंदू नववर्ष स्वागत समिती, अमळनेर यांच्या वतीने आयोजित २२ व्या वर्षीची भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. गुढी उभारून तसेच प्रताप शेटजी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली.

प्रताप मिल येथील बंसीलाल पॅलेस येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत गायत्री परिवार, प्रजापती ब्रह्मकुमारी, आर्मी स्कूल, तुकाराम महाराज, स्वामी नारायण, विश्व हिंदू परिषद, भगवान महावीर, अग्रेसन महाराज, प्रताप महाविद्यालय, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, फार्मसी स्कूल, क्षेत्रीय माळी समाज, गाडगेबाबा तसेच श्री गजानन महाराज मंदिर आदी विविध संस्था व मंडळांच्या आकर्षक रथ-झांक्यांनी सहभाग नोंदविला.
ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी व पारंपरिक व धार्मिक वातावरणात शोभायात्रा रंगतदार झाली. शहरातील तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. काही विषयांवरील झांक्यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. “जय श्रीराम” व “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शोभायात्रा शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी ठिकठिकाणी पाणी, शरबत व नाश्त्याची व्यवस्था केली होती. तसेच घरासमोर रांगोळ्या काढून व गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
यात्रा प्रताप मिल, स्टेशन रोड, स्वामी नारायण मंदिर, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, वाडी चौक, माळी वाडा, झामी चौक पोलीस चौकी, राजहंस चौक, पवन चौक, तिरंगा चौक, पाचपावली देवी मंदिर, कोंबडी बाजार, विजय शॉपी, पोस्ट ऑफिस, बजरंग सुपर मार्केट मार्गे श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे समारोप झाला.
त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. बजरंगशेठ अग्रवाल, डी. डी. पाटील व नीरज अग्रवाल यांनी सहभागी नागरिकांचे आभार मानले. आयोजकांनी नागरिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




