
अमळनेर:-येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने काल वर्षप्रतिपदेनिमित्त सघोष पथसंचलन मोठ्या उत्साहात काढण्यात आले.

यानिमित्ताने प्रताप मिल कंपाऊंड येथे स्वयंसेवक एकत्र जमले. प्रारंभी गणशः सर्वांचे संपत करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण व संघ प्रार्थना झाल्यानंतर संचलनास सुरुवात झाली.
संचलनात सर्वात पुढे भगवा ध्वज, त्यानंतर गण एक व दोन, त्यापाठोपाठ घोष पथक आणि त्यानंतर गण तीन ते सहा अशा शिस्तबद्ध रचनेत स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रताप मिल कंपाऊंड येथून कॉलेज रोड, धुळे रोड, भगवा चौक, मराठा मंगल कार्यालय, महाराणा प्रताप चौक, कचेरी रोड, बजरंग सुपर शॉप मार्गे पुन्हा प्रताप मिल कंपाऊंड येथे संचलनाची सांगता झाली.
संचलन मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या काढून तसेच फुलांचा वर्षाव करून स्वयंसेवकांचे स्वागत केले. सर्व स्वयंसेवक गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते.संचलनानंतर वर्षप्रतिपदेचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आद्य सरसंघचालकांना प्रणाम करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र शिंदे यांनी केले. जिल्हा संघचालक डॉ.
मनोज साळुंखे यांनी संघरचनेतील विविध जबाबदाऱ्यांची घोषणा केली.
यानंतर सांघिक पद्य, अमृतवचन व सुभाषितांचे सादरीकरण झाले. वैयक्तिक पद्य दिनेश पाटील यांनी सादर केले. प्रमुख वक्ते व अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व्यंकयाजी भागयाजी यांनी बौद्धिक मार्गदर्शन केले.
संघ प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.




