
21 रोजी रमजान ईदची आतुरता शिगेला, बाजारपेठेत गर्दी, सुका मेवा खरेदी जोरात
अमळनेर:- अवघ्या एका दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत कपड्यांसह अन्य पदार्थ आणि वस्तू खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होत आहे. विशेषतः शिरखुर्म्यासाठी सुकामेव्याची मागणी वाढली आहे.अमळनेर परिसरात नमाज अदा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

मुस्लिम मोहल्यांमध्ये रमजान ईदची आतुरता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी रमजान ईद २१ मार्चला साजरी होणार आहे.दोन दिवसांपासून ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी सुरू झाली आहे. ईदच्या निमित्ताने विविध प्रकारचे कापड, टोप्या, सुट, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, मुला-मुलींचे कपडे, बंगड्या, शिरखुर्म्यासाठी सुकामेवा, रंगीत शेवया यासह पठणी ड्रेस, देशी, विदेशातील खाद्यपदार्थ, खजूर आदींना मागणी वाढली आहे.
मुस्लिम समाज बांधवांसाठी रमजान महिना म्हणजे दानधर्माला अधिक प्राधान्य देणारा असतो. उत्पन्नातील अडीच टक्के रक्कम जकात म्हणून गरिबांना देवून आर्थिक सहकार्य केले जाते. तसेच या पर्वात गरिबांना कपडे, अन्नधान्य दिले जाते. विशेष म्हणजे दानधर्म करत असताना त्याची गुप्तता पाळली जात असते.ईदच्या दिवशी सकाळी इदगाह मैदानावर सर्व मुस्लिम समाज बांधव एकत्रित येऊन सामूहिक नमाज पठण करून शांतीची प्रार्थना करणार आहेत.




