
अमळनेर:- वडिलांचे वय ७९ वर्षे ….दोन्ही किडन्या फेल….अंथरुणाला खिळलेले….तशातच वडिलांनी सप्तशृंगी गडावर देवीला जाण्याची ईच्छा व्यक्त केली….शाळेच्या कामातून वेळ काढून वडिलांना गडावर नेऊ म्हणणाऱ्या शिक्षका च्या नशिबी दुर्दैव आले….वडिलांचे निधन झाले …ईच्छा अपूर्ण राहिली म्हणून मुलाने नंतर गावातील ४५ महिलांना सप्तशृंगीदेवीचे दर्शन घडवले.

अमळनेर तालुक्यातील गंगापूरी येथील भीमराव किसन रामोसे यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे ते अंथरुणाला खिळलेले होते. मृत्यूशी झुंज देत होते. अखेरच्या क्षणी त्यांनी आपला मुलगा महेंद्र रामोसे यांच्याजवळ सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. मुलाचेही डोळे पाणावले. आपल्या जन्मदात्याची अखेरची इच्छा पूर्ण करू ,शाळेच्या कामामुळे सुट्टीच्या दिवशी वडिलांना घेऊन जाऊ असे ठरले पण तत्पूर्वीच वडिलांनी प्राण सोडले. वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करू शकलो नाही म्हणून महेंद्र रामोसे याना मनाला बोचत होते. अखेर ठरवले की, वडिलांना नेऊ शकलो नाही म्हणून सर्व धार्मिक विधी कार्य आटोपल्यावर त्यांनी आपल्या आईसोबत गावातल्या ४५ महिलांना स्वखर्चाने गडावर नेऊन देवीचे दर्शन घडवले. भक्ती आणि श्रद्धा कोणत्याही मार्गाने पूर्ण करता येते. गावातल्या महिलांनी देखील महेंद्र रामोसे यांनी अशा पद्धतीने आपल्या वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले.




