
चैत्र नवरात्रोत्सव सुरू झाल्याने अमळनेर तालुका पत्रकार संघासह इतर संघटनांची मागणी
अमळनेर:-चैत्र नवरात्रोत्सव सुरू झाल्याने गडावर पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वाळूच्या अवजड वाहतुकीला दोन दिवस पूर्णपणे ब्रेक द्यावा अशी मागणी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने अमळनेर येथील महसूल व पोलीस प्रशासनास केली आहे.

यात म्हटले आहे की चैत्र नवरात्र उत्सवास सुरुवात झाली असून यानिमित्ताने नांदुरी गडावरील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पदयात्रा काढून गडावर जात असतात,अमळनेर सह पारोळा, चोपडा, धरणगाव सह इतर तालुक्यातील भाविक अमळनेर-धुळे मार्गे दिवसा व रात्री देखील पायी प्रवास करीत असतात.या वर्षी देखील मोठ्या संख्येने भाविक गडावर जाणार असल्याने भाविकांना त्रास नको म्हणून दिनांक 26 व 27 मार्च असे दोन दिवस वाळू वाहतुकीच्या अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी करावी.जेणेकरून लहान मुले,महिला व आबालवृद्ध भाविक सुरक्षित प्रवास करू शकतील.तरी अमळनेर उपविभागाचे प्रांताधिकारी श्री भंगाळे,डीवायएसपी विनायक कोते,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकुंभ यांनी संबंधित वाळू वाहतूकदारांना याबाबत तातडीने आदेशीत करावे अशी विनंती अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.




