
अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे रोडवरील बियर व वाईन शॉपी फोडून अज्ञात चोरट्यानी रोख रकमेसह बियरचे कॅन व सीसीटीव्ही डिव्हीआर हार्ड डिस्क असा सुमारे ३० हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना २० रोजी रात्री गलवाडे शिवारात घडली.

राकेश भगवान पाटील (राहणार गलवाडे) या माजी सैनिकाचे गलवाडे रस्त्यावर केशरी बियर व वाईन शॉपी असून २० रोजी रात्री साडे दहा वाजता त्यांनी आपले दुकान बंद केले होते. २१ रोजी सकाळी साडे दहा वाजता ते आपले दुकान उघडायला आले असता त्यांना दुकांनाचे शटरचे कुलूप तुटलेले आढळले. त्यांनी दुकान उघडले असता दुकानाच्या काउंटरचे कुलूप तोडून त्यातील १२ हजार ५०० रुपये गायब होते. दुकानातील बियरचे ७२ कॅन, सीसीटीव्ही डिव्हीआर हार्डडिस्कसह चोरून नेल्याचे दिसून आले. मारवड पोलिसांत तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ संजय सूर्यवंशी करीत आहेत.




