
अमळनेर : दिनांक २७ मार्च २०२६ पासून अमळनेर व पारोळा तालुक्यातील भाविकांसाठी नांदुरी गडावर जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमळनेर आगारामार्फत ही विशेष व्यवस्था करण्यात आली असून, प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार सकाळी ५:३० वाजल्यापासूनच जादा बस सेवा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही गावातून किमान ४० प्रवासी नांदुरी गडासाठी तयार असतील, तर त्या गावातून थेट नांदुरी गडापर्यंत बस सोडण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या विशेष बससेवेत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व सवलती लागू राहणार असल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर सवलतीधारक प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर व परवडणाऱ्या प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
दरम्यान, या सेवांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी अमळनेर आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन आगार प्रमुख प्रमोद चौधरी यांनी केले आहे.
नवरात्र, रामनवमीसारख्या धार्मिक पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता ही बस सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे परिसरातील हजारो भाविकांना मोठा फायदा होणार आहे.




