
अमळनेर पोलिसांनी शिताफीने पकडून पुन्हा सुरत येथील कारागृहात केले रवाना
अमळनेर : खुनाचा गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराने पॅरोल वर सुटून एका व्यापाऱ्याची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला असता अमळनेर पोलिसांनी त्याच्या घराला घेरा घालून शिताफीने पकडून पुन्हा सुरत येथील कारागृहात रवाना केले आहे.

अमळनेर येथील कैलास नवघरे याच्यावर अमळनेर येथे खून ,दहशत ,खंडणी ,जबरी चोरी ,रस्ता लूट सारखे गुन्हे दाखल असून त्याला गुजरात मधील व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. मात्र २७ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्याला पॅरोल वर सोडले होते. ४ रोजी त्याच्या पॅरोल ची मुदत संपल्यानंतर देखील कैलास नवघरे सुरत येथील कारागृहात परतला नव्हता. दरम्यान एका व्यापाऱ्याला त्याने जमीन माझी असून मला दे नाहीतर दोन कोटी रुपये दे असा दम दिला. व्यापाऱ्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना घटना कळवली. पोलिसांनी व्यापाऱ्याला लेखी फिर्याद द्यायला सांगितले असता दहशतीपोटी घाबरून व्यापाऱ्याने असमर्थता दर्शवली. मात्र गुन्हेगार खतरनाक आहे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव , सुनील तेली , प्रशांत पाटील ,उज्वल म्हस्के , मयूर पाटील , नितीन मनोरे ,होमगार्ड विशाल पाटील ,होमगार्ड पूनम हटकर अशा ११ लोकांचे पथक कैलास नवघरे याना आणायला पाठवले. मात्र कैलास यांच्या घराचे दोन्ही दरवाजे लावलेले आढळले. पोलिसांनी दोन्ही दारावर पहारा ठेवून त्याला आवाज दिला. त्याचवेळी कैलासने लहान खिडकीतून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पुन्हा घरात पळाला. दरवाजा उघडून पोलीस आत शिरले तेव्हा कैलास शौचालयाच्या वरच्या कोपऱ्यात लहानश्या जागेत लपून बसला. कैलास घरातच आला आणि गायब झाला म्हणून कानाकोपरा शोधल्यावर त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याला सुरत येथील लाजपोर सेंट्रल कारागृहात जमा केले. एक वर्षांपूर्वी देखील कारागृहातून पॅरोल वर सुटल्यानंतर कैलास नवघरे याने गाडी लुटण्याचा प्रयत्न केला होता.




