
पुरावे नसल्यास मतदार यादीतून नाव वगळण्याची शक्यता,
अमळनेर : मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असला तरी आवश्यक पुरावे नसल्यास हा हक्क धोक्यात येऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत २०२४ च्या मतदार यादीतील नावांचे २००२ च्या यादीशी मॅपिंग करण्याचे काम सुरू झाले आहे.

या प्रक्रियेत ज्या मतदारांचे नाव २००२ च्या यादीत आढळणार नाही किंवा आवश्यक कागदपत्रे सादर करता येणार नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विशेषतः लग्न होऊन सासरी गेलेल्या महिलांसाठी ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची ठरत आहे. सुनांना आपले नाव टिकवण्यासाठी माहेरच्या कुटुंबातील (आई-वडील किंवा आजी-आजोबा) २००२ मधील मतदार नोंदी शोधून त्यासंबंधित माहिती सादर करावी लागणार आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्या माध्यमातून हे काम सुरू असून आतापर्यंत अमळनेर तालुक्यातील सुमारे ५०टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. लवकरच प्रत्यक्ष घरभेटीद्वारे पुनर्निरीक्षण केले जाणार आहे. नागरिक घरी न आढळल्यास नोटीस देण्यात येईल आणि बीएलओ दोन ते तीन वेळा संपर्क साधतील. त्यानंतरही माहिती किंवा पुरावे न दिल्यास संबंधित मतदाराचे नाव थेट यादीतून कमी केले जाईल.
मतदारांना माहिती सुलभपणे मिळावी यासाठी प्रशासनाने क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच्या माध्यमातून २००२ व २०२४ च्या मतदार याद्या, तसेच संबंधित बीएलओचे नाव व मोबाईल क्रमांक तपासता येणार आहेत. तसेच ECINET या मोबाईल अॅपद्वारेही मतदार माहिती शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या प्रक्रियेला वेग आला असून मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू आहे. ज्या मतदारांचे नाव जुन्या यादीत आढळत नाही, त्यांना नागरिकत्व व वास्तव्यासंदर्भात १४ प्रकारचे पुरावे सादर करावे लागू शकतात.
आवश्यक माहिती (सुनांसाठी विशेष) :
आई-वडिलांचे संपूर्ण नाव
लग्नापूर्वीचे नाव
गाव/शहर, तालुका, जिल्हा
विधानसभा मतदारसंघ व क्रमांक
२००२ च्या यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक
पुराव्यांसाठी ग्राह्य कागदपत्रे :
१) जुनी मतदार यादी/निवडणूक पावती
२) जमीन किंवा मालमत्ता कागदपत्रे / भाडे नोंद
३) नागरिकत्व प्रमाणपत्र
४) कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र
५) नोंदणी प्रमाणपत्र
६) पासपोर्ट
७) एलआयसी पॉलिसी कागदपत्रे
८) शासनाचे परवाने/प्रमाणपत्र
९) शासकीय/निमशासकीय नोकरीचे पुरावे
१०) बँक/पोस्ट खाते पासबुक
११) जन्म प्रमाणपत्र
१२) शैक्षणिक प्रमाणपत्र
१३) न्यायालयीन कागदपत्रे
१४) रेशनकार्ड किंवा अन्य शासकीय ओळखपत्र
नागरिकांना आवाहन :
मतदार यादीत आपले नाव कायम ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि बीएलओला सहकार्य करावे, जे बीएलओ कामात कुचराई करतील त्यांच्या वर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे.
चौकट:-
अमळनेर शहरातील ज्या १० प्रभागात टक्के वारी कमी आहे त्या प्रभागात लवकरच कॅम्प लावला जाणार आहे. त्याभागातील नगरसेवक यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना सूचना देऊन सहकार्य करावे तसेच नागरिकांनीं देखील आवश्यक असलेली कागदपत्रे सोबत ठेऊन लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी केले आहे.




