
डास, मच्छर निर्मूलनासाठी कृती कार्यक्रम राबवण्याची मागणी…
अमळनेर :- शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर डासांचा त्रास नागरिकांना होत आहे. सार्वजनिक ठिकाणी अथवा कॉलनी परिसराच्या ओपन स्पेस मध्ये भयंकर डास मोठ्या प्रमाणावर त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना नियंत्रण करण्यासाठी शहरात फॉगिंग मशीन अथवा फवारणी होताना दिसत नाही.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्या कलगीतुऱ्यात सामान्य नागरिकांची होरपड होत असल्याचे निदर्शनास येते. तरी लोकहितासाठी डासांवर नियंत्रण आणण्यासाठी नगरपालिकेकडून उपाययोजना होणे गरजेचे आहे. अन्यथा सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच सकाळी सायंकाळी आणि रात्री तासांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे घरांमध्ये देखील त्याचा त्रास होत आहे. बाहेर मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर डास असल्यामुळे ते घरांमध्ये येतात. त्यामुळे डेंगू , मलेरिया सारखे आजार वाढण्याची शक्यता वाढली आहे. तरी नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करून शहरात डास नियंत्रणासाठी उपाययोजना केली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डी.ए. धनगर यांनी केली आहे. नागरिकांचे पालकत्व स्वीकारलेल्या धुरीनांच्या लक्षात आणून देखील उपाययोजना होताना दिसत नाही त्यामुळे तीव्र नाराजी नागरिकांमध्ये आहे. तरी वेळीच उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.




