
अमळनेर : शहरात रेल्वे बोगद्याच्या अलीकडे व विप्रो कंपनीच्या बाजूला दुपारी दोन वाजेला अचानक आगी लागल्या होत्या. अग्निशमन दलाच्या दोन्ही बंबानी वेळीच आग आटोक्यात आणली.

रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मोकळ्या जागांमध्ये तसेच शहरातील रिक्त भूखंडावर काटेरी बाभूळ वाढले आहेत. उन्हाळ्यात ती काटेरी झाडे काढल्याने तेथेच कोरडी होऊन पडलेली होती. अज्ञात व्यक्तीने कचरा पेटवला असावा किंवा बिडी सिगारेट पिणार्यांनी पेटती काडी फेकली असावी त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकाचवेळी आग लागली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांना दोन बंब पाठवण्यास सांगितले. विप्रो कंपनीच्या बाजूला लागलेली आग वाढत चालल्याने विप्रो अधिकारी चिंतेत पडले होते म्हणून त्यांनी एका बाजूने पाणी मारणे सुरू केले तर दुसरीकडे अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी , फारूख शेख ,दिनेश बिऱ्हाडे , सत्येंन संदानशिव , वसीम पठाण , मच्छीन्द्र चौधरी , भिका संदानशिव ,आनन्दा झिम्बल , आकाश संदानशीव, आकाश बाविस्कर यांनी प्रयत्न करून आग विझवली.




