
अमळनेर : तालुक्यातील भरवस येथील १२ वर्षीय हर्षल जाधव याचा सर्पदंशातून थरारक बचाव झाल्याची घटना समोर आली आहे. वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे त्याचा जीव वाचला असून सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे.
दिनांक २८ मार्च रोजी संध्याकाळी ४.३० वाजता हर्षल हा घरी मोबाईल खेळत असतांना त्याला काही तरी चावले त्याने लगेच आपल्या आईला सांगितले आईने वडिलांना कळविल्या नंतर ते लागलीच अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात आले.हर्षलला उजव्या हातावर सर्पदंश झाला असल्याने काही वेळातच त्याला डोळे झाकले जाणे (प्टोसिस), बोलण्यात अडचण, गिळताना त्रास तसेच श्वास घेण्यास अडचण अशी गंभीर लक्षणे दिसू लागली. परिस्थिती गंभीर असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रकाश ताळे यांनी तात्काळ अँटी-स्नेक व्हेनम (ASV) देऊन प्राथमिक उपचार केले. मात्र, रुग्णाची प्रकृती खालावत गेल्याने आणि श्वसन स्नायूंवर परिणाम होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी त्याला तातडीने नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे हलविण्यात आले.

नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये दाखल होताच रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी तातडीने CPR करून इंट्युबेशनद्वारे व्हेंटिलेटरवर ठेवले. डॉ. संदीप जोशी, डॉ. अर्जुन पावरा, डॉ. परेश पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील आणि डॉ. पायल नेतकर यांच्या तज्ज्ञ टीमने समन्वयाने उपचार करत हर्षलचा जीव वाचवण्यात यश मिळवले. उपचारानंतर हर्षलची प्रकृती सुधारली असून तो आता पूर्णपणे शुद्धीवर आला आहे. या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, सर्पदंशानंतरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. योग्य वेळी अँटी-स्नेक व्हेनम आणि व्हेंटिलेटरची सुविधा मिळाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो. उशीर किंवा अंधश्रद्धेमुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. मुलाच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानताना भावनिक शब्दांत सांगितले, “आमच्या मुलाला नवजीवन दिल्याबद्दल आम्ही आयुष्यभर ऋणी राहू.”आपण सर्व आमच्या साठी देवदूत आहात.या यशस्वी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रकाश ताळे तसेच नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या संपूर्ण डॉक्टर टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.




