
अमळनेर : शहरातील गलवाडे रस्त्यावर गतिरोधक नसल्याने एका महिलेचा जीव गेला होता मात्र गतिरोधक बसवताच मुडी येथील महिलेचा दुचाकी गतिरोधकावर आदळून रस्त्यावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

शहरातील दाजीबा नगर भागात गलवाडे कडून येताना उतार असल्याने वाहनांचा वेग वाढून वाहने अनियंत्रित होत होती. त्याचप्रमाणे याचठिकाणी तीन मंगल कार्यालये असल्याने नेहमीच वर्दळ आणि रस्त्यावर वाहने उभी असतात. १५ मार्च रोजी रात्री नऊ वाजता याच परिसरातील शोभाबाई जयवंतराव पाटील या महिलेला वाहनाने वेगात धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. संतप्त नागरिकांनी गतिरोधकची मागणी केली होती. काही दिवसात स्थानिक नागरिकांनी गतिरोधक टाकून घेतले. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले. गतिरोधक टाकल्यानंतर त्याच्या अलीकडे आणि पलीकडे पांढरे पट्टे मारले पाहिजेत तसेच गतिरोधकचे फलक लावले पाहिजेत मात्र तसे झाले नाही म्हणून जे दुष्परिणाम व्हायचे ते झालेच.
२८ रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास गायत्री प्रशांत सूर्यवंशी वय ४४ रा मुडी हल्ली मुक्काम दीपक नगर ढेकू रोड ही महिला आपल्या भावाबरोबर मोटरसायकलने गलवाडे कडून येताना गतिरोधक दिसला नाही परिणामी मोटरसायकल आदळून महिला खाली पडली आणि तिच्या डोक्याला मार लागताच ती बेशुद्ध झाली. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला स्थानिक डॉक्टरांनी तिला धुळे येथे रवाना केले. धुळे येथे सेवा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू केले. व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले. जीव वाचणे कठीण असल्याचे डॉक्टरांनी सांगताच महिलेला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. पुन्हा आशा पल्लवित झाल्या आणि तिला तातडीने मुंबई रवाना केले. जे जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र तिची मृत्यूशी झुंज व्यर्थ ठरली आणि २ एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजता तिचा मृत्यू झाला.
अपघात होऊ नये म्हणून गतिरोधक बसवणे आवश्यक आहेत मात्र त्या गतिरोधकामुळे अपघात होऊ नये म्हणून प्रवाश्याना ते निदर्शनास येणे आवश्यक आहे. म्हणून कॅट आईज लावणे , पांढरे पट्टे लावणे ,फलक लावणे आणि उतारावरील रस्त्यावर गती नियंत्रित करण्यासाठी रबलिंग स्ट्रीप टाकणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे दोन्ही महिलांचा जीव गेला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.




