
अमळनेर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यात चोपडाई आणि अंतुर्ली – रंजाणे गावांसाठी थेट सरपंच पदाची देखील निवड होणार आहे.

अंतुर्ली- रंजाणे येथील लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण होते तर चोपडाई येथील लोकनियुक्त सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. दोन्ही सरपंचांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले असून थेट जनतेतून निवड होणार आहे. त्याच प्रमाणे मुंगसे येथील प्रभाग ३ अनुसूचित जमाती स्त्री या पदावर कोणीच उमेदवारी दाखल केली नव्हती म्हणून पुन्हा निवड होत आहे. तर प्रभाग १ मधील अनुसूचित जमातीचा उमेदवार मयत झाल्याने पुन्हा निवड होत आहे. नन्दगाव – लडगाव येथील प्रभाग १ मधील सर्व साधारण स्त्री या उमेदवाराने निवडणूक खर्च सादर केला नाही म्हणून अपात्र ठरल्याने पद रिक्त झाले होते. डांगर बुद्रुक येथील प्रभाग १ मधील सर्वसाधारण स्त्री व प्रभाग ३ मधील सर्वसाधारण ग्रा प सदस्य मयत झाल्याने दोन्ही पदे रिक्त आहेत. चोपडाई येथील प्रभाग २ मधील सर्वसाधारण आणि प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती प्रवर्ग उमेदवारांनी राजीनामा दिल्याने दोन्ही पद रिक्त झाले होते.
७ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान सुटीचे दिवस वगळून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. १५ रोजी छाननी होईल तर १७ रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे तर आवश्यकता भासल्यास २९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.




