
अमळनेर : येथील ताडेपुरा पैलाड भागातील नवीन स्मशानभूमीचे पूर्णत्वाचे काम अखेर सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अमळनेर नगरपरिषद अंतर्गत ताडेपुरा पैलाड भागात नवीन स्मशानभूमी ८० टक्के बांधण्यात आली आहे. जुन्या स्मशान भूमीचे तिन्ही बेड तुटलेले असल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या प्रेतांना खाली जमिनीवर दहन करावे लागत होते. नव्या स्मशान भूमीच्या कामाचे बिल जिल्हास्तरावरून प्राप्त झाले होते मात्र ऑडिट अपूर्ण आहे म्हणून पालिका ठेकेदाराला बिल अदा करत नव्हते आणि ठेकेदार काम पूर्ण करत नव्हता त्यामुळे प्रेताची विटंबना होऊन नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जात होत्या. याबाबत प्रसार माध्यमांनी सत्ताधारी आणि विरोधक यांनी राजकारण विसरत काम पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले होते. पालिकेने ठेकेदाराला काम पूर्ण करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. तर ठेकेदार बिलासाठी असून बसला होता.
अखेर ठेकेदाराने आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रेताची विटंबना होऊ नये म्हणून माणूसकीची भावना जपत कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकानी समाधान व्यक्त केले आहे.
जनतेच्या भावनांशी खेळणे योग्य नव्हते. बिल मिळण्यापेक्षा जनहित महत्वाचे आहे. अंतिम समयी प्रेताचे हाल होऊ नये म्हणून काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच काम पूर्ण होईल- मिहीर हेमंत पवार , ठेकेदार




