
अमळनेर : सध्या राज्यभर उन्हाची तीव्रता जाणवत असतांना तालुक्यात सुध्दा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान चाळीशी जवळ पोहचल्याने व ते दिवसेंदिवस अधिक होण्याच्या मार्गांवर असल्याने नागरिकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

स्थानिक शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये लहान मुलांना मध्ये डायरीया चे प्रमाण वाढले आहे.
विषाणू जन्य ताप, मळमळ, जुलाब पोट दुखी, रोजचे ८ ते १० रुग्ण असतात. चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ व अशक्तपणा यांसारख्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषतः दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उष्माघाताचा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे
भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे, त्यात लिंबू पाणी, चिंच पन्हे, ओ. आर. एस. पाणीत मिसळून पिणे, डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरावा. हलके व सैल कपडे परिधान करावेत. लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. उष्माघात कक्ष लवकर तयार केले पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.
“सध्या तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेत दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.”
डॉ. जि. एम. पाटील, , वैद्यकीय अधिकारी,ग्रामीण रुग्णालय, अमळनेर




