
अमळनेर : कुटुंब पुण्याला गेल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ४ एप्रिल रोजी ढेकू रस्त्यावरील जय योगेश्वर कॉलनीत घडली.

वैशाली चंद्रकांत वाघ या १४ मार्च पासून आपल्या मुलाकडे पुण्याला गेलेल्या होत्या. ४ रोजी मुलाच्या मित्राने सांगितले की तुमच्या घराचा कडी कोंडा तोडलेला दिसून येत आहे. तेव्हा दुसऱ्या मित्रांनी घरी जाऊन खात्री केली असता कपाट उघडून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले.५ रोजी सकाळी वैशाली वाघ अमळनेर आल्या असता त्यांना घरातील कपाटाचे कुलूप देखील तोडलेले आढळून आले. कपाटातील ३० हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या , १२ हजार रुपये किमतीच्या चार अंगठ्या , १० हजार रुपये किमतीचे ३० भार चांदीचे दागिने १२ हजार रुपये रोख असे एकूण ६४ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे आढळून आले. वाघ यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ ,३३१ (४) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.
दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलिसांना घटनास्थळी पाठवले असता सीसीटीव्ही मध्ये चार चोरट्यांच्या हरकती कैद झाल्या आहेत. एक जण बाहेर पहारा देत असताना चोरट्यानी पिशव्यांमध्ये घरातील साहित्य लंपास केले आहे. घरातील काही तांबे ,पितळ आणि कास्याची भांडी देखील चोरीला गेले आहेत.




