
कळमसरे -शहापूर रस्त्यावर मध्यरात्री दरम्यान घडली घटना,
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे -शहापूर रस्त्याच्या सुरु असलेल्या फरशी पुलाजवळ बुलेट गाडीचा ता. 7 रोजी रात्री भीषण अपघात होऊन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,सुनील सीताराम शिंदे (वय २६ वर्षे रा.सोनगीर जि. धुळे) हा ६ रोजी कळमसरे येथे लग्नासाठी कुटुंबासोबत आला होता. हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री बुलेट ने घरी परतताना रात्रीच्या वेळेस शहापूर -कळमसरे दरम्यान सुरू असलेल्या फरशी पुलाच्या खड्यात बुलेट समवेत जाऊन पडला. परिणामी खड्यातील सिमेंट पाईपच्या कडेला मधोमध अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली.
मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतास शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मयत सुनील शिंदे याच्या पच्यात वृद्ध आई, वडील, पत्नी एक मुलगी, एक मुलगा आहे. सुनीलच्या या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वाहनावरील ताबा सुटून पुलाच्या कामाच्या ठिकाणी अडकल्याने जागीच मृत्यू झाल्याची नोंद मारवड पोलिसांत करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ संजय सूर्यवंशी करीत आहेत.




