
अमळनेर तालुक्यासाठी फ्रुटसेल सोसायटीला ज्वारी खरेदीची परवानगी
अमळनेर : मार्केटिंग फेडरेशन तर्फे रब्बी हंगामाच्या शासकीय भरड धान्य खरेदीची नोंदणी १ एप्रिल पासून सुरू झाली असून अमळनेर तालुक्यासाठी फ्रुटसेल सोसायटीला ज्वारी खरेदीची परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हा पणन अधिकारी एस एस मेने यांनी पत्राद्वारे खरेदी संस्थांना निर्देश दिले आहेत. प्रथमच अमळनेर तालुक्यातील फ्रुटसेल सोसायटीला भरड धान्य खरेदी करायला संधी प्राप्त झाली आहे. १ एप्रिल ते ३० एप्रिल नोंदणीची मुदत असून १ मे ते ३० जून दरम्यान ज्वारी खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मर्यादा आणि तालुक्याचे उद्दिष्ट जाहीर झालेले नाही मात्र शासकीय हमीभाव ३७५० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला आहे. सध्या बाजारात २२०० ते २७०० रुपये प्रति क्विंटल भावाने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होत आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांनी आधार कार्ड , बँक पासबुक , शेती उतारा , सातबारा आदी कागदपत्रे मोबाईल नम्बर अचूक देऊन अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीत नोंदणी करून घ्यावी. प्राधान्यक्रमानेच शेतकऱ्यांना खरेदीसाठी बोलावण्यात येईल.- भागवत पाटील ,चेअरमन फ्रुटसेल सोसायटी अमळनेर
गेल्या पाच दिवसांपासून ऑनलाईन सातबारा , उतारा निघत नाही. साईट जाम सांगितले जात आहे तर नोंदी कशा करणार. वारंवार तालुक्याला चकरा माराव्या लागतात- शेतकरी , अमळनेर
६ रोजी संध्याकाळी ६ वाजता पत्र आले. शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली. ७ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५०९ शेतकऱ्यांची नोंद झाली आहे.- लहू पाटील ,व्यवस्थापक , फ्रुटसेल सोसायटी अमळनेर




