
लग्नसराईत मोठा फटका, प्रशासनाकडे तातडीने सिलेंडर उपलब्धतेची मागणी
अमळनेर : शहरासह तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने केटरर्स व हॉटेल व्यावसायिकांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर गॅस उपलब्ध नसल्याने अनेकांनी घेतलेली जेवणाची कामे अडचणीत आली असून व्यवसायावर थेट परिणाम होत आहे.

अमळनेरमधील केटरर्स व हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाकडे निवेदन देत लवकरात लवकर व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. गॅस वितरण सुरळीत न झाल्यास अनेक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, स्वयंपाकासाठी गॅस हा अत्यावश्यक घटक असून त्याशिवाय व्यवसाय करणे अशक्य आहे. या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने ही परिस्थिती गंभीर बनली आहे.
दरम्यान, केटरर्स व हॉटेल व्यावसायिकांनी दिलेल्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली असून तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रशासनाकडून लवकर तोडगा काढण्याची अपेक्षा आहेत.
यावेळी अमळनेर टेन्ट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बडगुजर, अमळनेर हॉटेल असोसिएशन अध्यक्ष मनीष जोशी,घनश्याम अग्रवाल,कैलास पाटील, राजूभाऊ शेटे,मनोज दीक्षित, कन्हैया सासनांनी, बी बी जैन, विजय पाटील,,गिरीश सराफ ,चंदू परदेशी, मयूर चौधरी अरुण नेरकर,अभिमान पाटील,शाम राणे,दिलीप यावले, अनिल चौधरी, सतू महाजराज, विनोद पाटील,सुशील जैन, राजेंद्र मोरे,आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
घरगुती गॅस बाबत सुध्दा हिच परिस्थिती आहे. सामान्य लोक रोजच गॅस सिलेंडर साठी लाईन लावून व बुकिंग करून गॅस सिलेंडर साठी तटकळत फिरत आहेत. काही लोकांनी पुन्हा लाकूडफाटा वापर करून स्वयंपाक सुरु आहे.
“गॅसअभावी व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे.“सध्या गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. ग्राहकांना सेवा देणे कठीण झाले असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”
मनिष जोशी
हॉटेल युनियनचे अध्यक्ष, अमळनेर
“लग्नसराईच्या हंगामात आम्ही अनेक कार्यक्रमांची जबाबदारी घेतलेली असते. मात्र गॅसच उपलब्ध नसल्याने कामे वेळेत पूर्ण करणे अवघड झाले आहे. याचा आर्थिक फटका बसत आहे.”
प्रवीण बडगुजर, टेन्ट व केटरर्स युनियन अध्यक्ष, अमळनेर ,
“व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत माहिती घेतली जात असून संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून लवकरच पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल.”
मयूर भंगाळे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर




