
अमळनेर : शहरात सुरू असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. परंतु या कामामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार प्रभाग क्रमांक १४ मधील बालाजी पुरा,शाळा न.६, उर्दू शाळेजवळील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात २४ तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार , जेसीबीने खोदकाम करीत असतांना निट केले जात नाही. त्यामुळे अनेकांचे नळ कनेक्शन काम करताना तोडफोड होत आहे.अनेक ठिकाणी पाईपलाईन तुटत असून त्यांची योग्य दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन लागत आहे. याशिवाय, रस्ते खोदून ठेवले असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना दैनंदिन हालचालींमध्येही अडचणी येत आहेत. तक्रारी करूनही संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. प्रभाग १४ मधील नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही कामात सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी कामात गती आणून नियमित तुटलेली नळ जोडणी लवकर करावी व पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच निष्काळजीपणाबाबत जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर हर्षला महेश्वारी, धर्मेंद्र जाधव, इंद्रजित पाटील, रंजना भादलीकर, अर्चना बाळापुरे, सिमा बाळापुरे, मधुकर बाळापुरे, समाधान पाटील, सुरेश पाटील, देवाजी ठाकूर यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.




