
अमळनेर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली असून आतापर्यंत ४ अर्ज दाखल झाले आहेत.

डांगर बु. येथे वार्ड १ मध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. तसेच चोपडाई येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी एक, वॉर्ड २ मध्ये सर्वसाधारण एक आणि तर वार्ड ३ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक असे अर्ज दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल झाले आहेत. दरम्यान, चोपडाई व अंतुर्ली-रंजाणे येथे सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. तर मंगसे, नंदगाव-लडगाव व डांगर बु. येथे विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल असून १५ एप्रिल रोजी छाननी, तर १७ एप्रिलला चिन्हवाटप करण्यात येणार आहे. मतदान २८ एप्रिल रोजी पार पडणार असून आवश्यक असल्यास २९ एप्रिलला पुनर्मतदान घेतले जाणार आहे.




