
अमळनेर : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत आगी विझवण्यात यश मिळवले.

११ रोजी दुपारी बारा साडे बारा वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील बोदरडे गावातील पांडुरंग पाटील यांच्या मक्याच्या शेतात डीपी शॉर्ट सर्किट झाल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली. पारोळा येथील अग्निशमन दल अपूर्ण पडणार होते म्हणून मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अमळनेर अग्निशमन दलाचे प्रमुख गणेश गोसावी ,दिनेश बिऱ्हाडे , फारूख शेख , जफरखान पठाण , मच्छीन्द्र चौधरी , भिका संदानशीव ,वसीम पठाण , लखन कंखरे ,आकाश बाविस्कर ,अजय बिऱ्हाडे याना पाठवले. पारोळा येथील आग आटोक्यात आली तोपर्यंत अमळनेर येथे पैलाड भागातील दूध डेअरीजवळ चाऱ्यास व शेण खतास आग लागली लागलीच कर्मचाऱ्यांनी धावपळ करत तेथील आग विझवली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पुन्हा ऍड ललिता पाटील यांच्या घराजवळ पिंपळाच्या झाडाला आग लागली. दिवा लावल्यामुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. अग्निशमन बंम्ब वेळेवर पोहचला आग त्वरित नियंत्रणात आली. त्याचवेळी सराफ बाजारात अग्रवाल डेअरी जवळ पडीत जागेत आग लागली त्या आगीवर देखील दलाने त्वरित नियंत्रण मिळवले. एकाच दिवशी चार ठिकाणी आगी लागल्याने कर्मचाऱ्यांची खूप धावपळ झाली.




