
अमळनेर : जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी उपविभागीय व तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी संप पुकारला. या संपात १० मंडळ अधिकारी, ९ सहाय्यक महसूल अधिकारी, ५० ग्राम महसूल अधिकारी, १३ महसूल सहाय्यक व इतर १० कर्मचारी सहभागी झाले आहेत.

संपामुळे महसूल विभागासह नगरपरिषद, शिक्षण आदी शासकीय कार्यालयांतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून पहिल्याच दिवशी नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले, तर शाळकरी विद्यार्थी दाखल्यांसाठी कार्यालयीन परिसरात हेलपाटे मारताना दिसून आले.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, रिक्त पदे तातडीने भरणे तसेच आरोग्य विमा योजनेअंतर्गत कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देणे या मुद्द्यांचा समावेश आहे. तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री स्तरावर नियमित चर्चासत्र आयोजित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
सकाळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना सादर केले. यावेळी जगदीश पाटील, मुकेश काटे, अनिल चौधरी, संगीता घोंगडे, प्रियंका पाटील, विद्या पाटील, किशोर अनिल परदेशी, नईम मुजावर, अधिकार निकम आदी उपस्थित होते.
शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, नागरिकांनीही या संपावर त्वरित तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




