
अमळनेर : तालुक्यातील वावडे येथे आणि लोणे शिवारात शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकऱ्यांचा मका ,ज्वारी चारा जळून सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.

उशाबाई दिलीप पाटील रा वावडे यांची मांडळ शिवारात गट २६७ , २६८ मध्ये शेती असून शेजारच्या शेतात डीपी आहे. २० रोजी दुपारी डीपी मध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक शेतातील चाऱ्याला आग लागली. ती आग पसरून उशाबाई च्या शेतात लागली गावकऱ्यांनी तातडीने आग विझवली तरी चार बिघे शेतातील ज्वारी चारा ,शेतातील कणसे आणि १० पाईप जळून खाक झाले. सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तर १८ एप्रिल रोजी रात्री एक वाजता लोणे शिवारात उशाबाई अरुण पाटील हिच्या शेतातील विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने शेतात काढलेला ५० हजार रुपयांचा मका आणि ३० हजार रुपयांच्या ठिबक नळ्या जळून एकूण ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी भेट देऊन पंचनामा केला. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.
दरम्यान दोन्ही घटना शॉर्ट सर्किट मुळे झाल्याने दोन्ही शेतकऱ्याना वीज मंडळातर्फे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.




