
अमळनेर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अमळनेर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली उघड्यावर मद्यपान करणाऱ्या तळीरामांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली असून, या मोहिमेत तब्बल १७ जणांवर कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत गलवाडे रोड परिसरातील १२ जणांवर, तर गांधलीपुरा पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या कॉम्प्लेक्स परिसरातील ५ जणांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहरातील वाढते सार्वजनिक गैरप्रकार, नागरिकांच्या तक्रारी तसेच तरुणांमध्ये वाढणारी चैनीची प्रवृत्ती लक्षात घेऊन ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असल्याचे समजते. या कारवाईमुळे शहरात पोलीस प्रशासनाविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, सुज्ञ नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. अमळनेर शहरात कायदा मोडणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.
प्रतिक्रिया…
“शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील.”
— दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक, अमळनेर




