
अमळनेर:- उष्णतेच्या कहरामुळे अमळनेर तालुक्यात दिनांक 17 रोजी चार वेगवेगळ्या ठिकाणी तर 18 रोजी एका ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. मात्र, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून सर्व आगी आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

सकाळी 12:45 वाजता मंगरूळ येथे गावालगत खळवाडीस आग लागली, दुपारी 1:55 ला मारवड रोडवरील शेतात आग लागली,दुपारी 2:05 ला गलवाडे रोडवर गंगा एक्वाजवळील झाडांना आग लागली तर दुपारी 2:15 वाजता नंदगाव रोडवरील शेतांना आग लागली. नगरसेवक मुक्तार खाटीक,पंकज चौधरी व भुरा चौगुले यांनी दूरध्वनीवरून संदेश देताच अग्निशमन दल चारही ठिकाणी वेळेवर पोहोचले. अग्निशमनाधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, मुन्ना धनगर, आकाश बाविस्कर यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
तांबेपुरा नंदगाव रोड येथे आग विझवताना नगरसेवक मुक्तार खाटीक, बाबा खाटीक यांच्यासह शेतकरी नाना हिलाल पाटील, शेषराव रामराव पाटील, चेतन विजय पाटील यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाढत्या उष्णतेमुळे आगीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धुळे रोडवरील रवी नगर परिसरात दि.18 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास रविंद्र बोरसे यांच्या घराजवळ अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. सुरवातीला येथील रहिवाशीनी पाणी मारून विझवण्यासाठी प्रयत्न केला.मात्र आग वाढतच होती. सुदैवाने नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.




