
अमळनेर–नंदुरबार रेल्वेमार्गावरील स्टेशनांवर मूलभूत सुविधांचा बोजवारा…
अमळनेर – भर उन्हाळ्यात तापमानाने ४३ अंशांचा टप्पा ओलांडला असताना अमळनेर ते नंदुरबार रेल्वेमार्गावरील अनेक स्टेशनांवर प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण फिरण्याची वेळ आली आहे. एका बाजूला रेल्वे प्रशासनाकडून “अमृत भारत योजना” अंतर्गत कोट्यवधी रुपयांची सुशोभीकरणाची कामे केली जात असताना दुसऱ्या बाजूला प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

अनेक स्टेशनांवरील पिण्याच्या पाण्याचे नळ तुटलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी नळ असूनही पाणीच उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी पाण्याच्या बाटल्या विकत घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. भर उन्हाळ्यात थंड पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले व रुग्ण प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
इतकेच नव्हे तर अनेक स्टेशनांवरील पंखे बंद अवस्थेत असून प्रवासी प्रतीक्षालयांना कुलूप असल्याचे दिसून येत आहे. महिलांसाठी व पुरुषांसाठी असलेल्या वॉशरूममध्येही पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, “प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्याऐवजी रेल्वे प्रशासन फक्त दिखाऊ विकासावर भर देत आहे.” अमळनेर रेल्वे स्टेशनवर अमृत भारत योजनेअंतर्गत आधीपासून चांगल्या स्थितीत असलेले मार्बल काढून नव्याने फरशी बसवण्याचे काम सुरू आहे. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून गार्डन व सुशोभीकरणाच्या विविध कामांवर भर दिला जात आहे. मात्र पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सुरू अवस्थेतील पंखे आणि उघडी प्रतीक्षालये यांसारख्या अत्यावश्यक सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.
“स्टेशन सुंदर दिसण्यापेक्षा प्रवाशांना सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे. रेल्वे प्रशासनाने प्रथम पिण्याचे पाणी, स्वच्छ वॉशरूम, सुरू अवस्थेतील पंखे आणि उघडी प्रतीक्षालये यांची व्यवस्था करावी,” अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये रेल्वे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता स्थानिक खासदारांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रेल्वे प्रशासनाला जाब विचारावा, तसेच अमळनेर ते नंदुरबार रेल्वेमार्गावरील सर्व स्टेशनांवर मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे.
प्रतिक्रिया १) रविवार रोजी गाडी क्र.५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर दुपारी सहपरिवार प्रवास करत असताना सर्व स्टेशनवर गाडी थांबली असता पिण्याच्या पाण्याची बाटली भरण्याकरिता उतरलो असता कुठेच पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. नाईलाजाने मला विकत पाण्याची बाटली घ्यावी लागली. तरी रेल्वे प्रशासनाने तीव्र उन्हाळा असल्याने त्वरित सर्व स्टेशनवर प्रवाशांसाठी थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
राजेंद्र नामदेव कोळी,प्रवासी,आसोदा (जळगाव)
प्रतिक्रिया २) दुपारी पाडसे स्टेशनवर भुसावळ – नंदुरबार पॅसेंजर आली असताना पाण्याच्या टाकीत ठेकेदाराने पाण्याचा सप्लाय केलेला होता.पण स्टेशन मास्तरांकडून व्हॉल सुरू करण्यात आला नसल्यामुळे स्टेशनवरील नळांना पाणी नव्हते. पाणी नसल्याबाबत स्टेशन मास्तरांना सूचना देतो.
पंकज हाडेकर, इन्स्पेक्टर ऑफ वर्क्स, रेल्वे विभाग, अमळनेर
प्रतिक्रिया ३) उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने टाकीत खूपच गरम पाणी होते. जे प्रवाशांना पिण्यायोग्य नसते.त्यामुळे स्टेशन वरील पाण्याच्या टाकीत आज पाणी चढविले नाही. त्यामुळे दुपारी भुसावळ – नंदुरबार पॅसेंजर आली असता स्टेशन वरील नळांना पाणी नव्हते. उद्यापासून नियमित टाकीत पाणी चढविण्यात येईल व गाडी येण्याच्या अगोदर व्हॉल सोडण्यात येईल. जेणेकरून स्टेशनवर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.
एम. एस. प्रसाद,
स्टेशन मास्तर,पाडसे रेल्वे स्टेशन




