
अमळनेर:- तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत काल दिनांक 21 रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होऊन अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली

तिन्ही पॅनलमधील उमेदवारांना समान चिन्ह देण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता सहाय्यक निबंधक कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली.चिन्ह मिळताच उमेदवारांनी सायंकाळपासूनच प्रचारास प्रारंभ केला.राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल रिंगणात उतरविले असून यात 15 उमेदवारांचा समावेश आहे.तर भाजपाने खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली किसान विकास पॅनल गठीत केले असून यात 14 उमेदवार दिले आहेत.महिला राखीव गटात या पॅनेलने एकच उमेदवार दिला आहे.तर काँग्रेस पक्षाने प्रा सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल जाहीर केले असून या पॅनलने सोसायटी मतदारसंघात एकही उमेदवार दिला नसल्याने 10 उमेदवारांचे पॅनल जाहीर केले आहे.
सदर निवडणुकीत वरील तीन पॅनलमध्ये तिरंगी लढतीचे चित्र असून महायुतीचे घटक असलेले विद्यमान आमदार व खासदार आमने सामने येऊन ठेपले आहेत.त्यात काँग्रेसने आव्हानेही आव्हान उभे केले आहे.माजी आमदार शिरीष चौधरी तथा शिवसेना शिंदे गटाने मात्र एकही उमेदवार दिला नसल्याने या निवडणुकीपासून हा पक्ष अलिप्त असल्याचे
स्पष्ट झाले आहे.
शेतकी संघाचे जनरल मतदारसंघाचे मतदार तालुकाभर विखुरलेले असल्याने तडपत्या उन्हात प्रचारास जाताना व्यक्तिशः मतदारसंघातील उमेदवारांची कसरत होणार आहे,त्यात प्रचाराला आठच दिवस शिल्लक असल्याने मोठी धावपळ होणार आहे.शहरात देखील मतदारांची संख्या मोठी आहे.अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होत असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. 30 मे रोजी मतदान व 31 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.




