अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा , नांद्री आणि झाडी येथून तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना २८ रोजी घडल्या आहेत. तर शहरातून एक १९ वर्षीय तरुणी २८ रोजीच बेपत्ता झाली आहे.
तालुक्यातील टाकरखेडा येथील ९ वि तील १४ वर्षाच्या मुलीची आई २८ रोजी सकाळी ८ वाजता वीट भट्टीवर कामाला गेली होती. दुपारी २ वाजता ती परत आली असता तिला मुलगी घरी दिसली नाही. गावात शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही. गावातून तिला माहिती मिळाली की, कुणाल नामक तरुणाने तिला पळवून नेले आहे. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सदरची अल्पवयीन तरुणी पोलिसांना मिळून आल्याची माहिती आहे.
त्याचप्रमाणे नांद्री येथील एक १५ वर्षे वयाची तरुणी २८ रोजी रात्री आपल्या कुटुंबासोबत झोपली होती. २९ रोजी पहाटे २ वाजता घरात आढळून आली नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. गावातील काही लोकांनी सांगितले की रोहित नामक तरुणाने त्या मुलीला पळवून नेले आहे. म्हणून मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रोहित यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.
झाडी येथील एक १७ वर्षाची मुलीला २८ रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी मारवड पोलीस स्टेशनला दिली असून तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत. तर २८ रोजी सकाळी ११ ते २९ रोजी पहाटे ३ दरम्यान शहादा येथील मच्छी बाजारातील राहणारी १९ वर्षीय तरुणी अमळनेर येथील म्हाडा कॉलनी आपल्या नातेवाईकांच्या घरून बेपता झाली आहे. तिच्या नातेवाईकांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून तिची हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

