
Oplus_131072
अमळनेर:- भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने मोटरसायकल पाठोपाठ एस टी ला धडक दिल्याने तिहेरी अपघातात सहा जण ठार झाल्याची घटना ९ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास अमळनेर धुळे रस्त्यावर मंगरूळच्या पुढे हॉटेल वृंदावन जवळ घडली.
गुजरात मधील व्यारा येथील रहिवासी मूळ अंबापिंप्री येथील रहिवासी महाजन कुटुंबीय आपल्या भाच्याचा अमळनेर येथील राजेंद्र एकनाथ महाजन यांच्या मुलीशी साखरपुडा साठी चार चाकी क्रमांक जी जे १९ ए एफ ३१४७ ने धुळ्याकडून अमळनेरला येत असताना अमळनेर कडून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच १८ , सी ८७१९ , आणि त्या मागील एस टी बस एम एच १३ सी यु ७५४० ला जोरात धडक दिली. धडक इतक्या जोरात होती की मोटरसायकलस्वार पशु वैद्यकीय अधिकारी निलेश सुखदेव तावडे वय २५ रा मालपूर( दोंडाईचा) ता शिंदखेडा हा फेकला जाऊन जागीच ठार झाला तर त्याच्या मागे बसलेली फाल्गुनी उर्फ सोनल एकनाथ चव्हाण (भोई) हल्ली मुक्काम उदना ( सुरत ) ही एस टी च्या काचेवर जाऊन धडकली. सोनल ही मामाकडे धरणगाव येथे एस वाय बी ए च्या परीक्षेला आलेली होती. मैत्रिणीसोबत अजिंठ्याला जाऊन येते असे तिने सांगितले होते. तर निलेश पहाटे पाच वाजता मालपूर येथून घराबाहेर निघाला होता.मोटरसायकल चा पूर्ण चेंदामेंदा झाला होता. चार चाकीतील सुरेश विक्रम महाजन वय ५२ , नंदलाल गोपाल महाजन वय ६० , निर्मलबाई नंदलाल महाजन वय ५४ , अनिता सुरेश महाजन वय ४० सर्व रा व्यारा गुजरात मूळ रा अंबापिंप्री ता पारोळा हे चौघे देखील डोक्याला व इतरत्र मार लागल्याने जागीच ठार झालेत. तर चार चाकी चालक आदित्य चंद्रकांत महाजन वय २३ हा चार चाकीत अडकून पडला होता. पोलीस आणि गावकरी यांच्या मदतीने लोखंडी टॅमि ने पत्रा उचकावून बाहेर काढण्यात आले. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. आदित्य च्या भावाचे १७ जून रोजी लग्न असल्याने तो साखरपुडा निमित्त लग्नाच्या पत्रिका वाटायला आला होता. ११२ ची तत्पर कारवाई अपघाताचे वृत्त ११२ ला कळवण्यात आल्यावर अवघ्या ५ मिनिटात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , चालक रवींद्र पाटील , पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने आदित्यला बाहेर काढले आणि १०८ ने धुळे येथे उपचारासाठी रवाना केले. चारचाकीत अडकलेले शव बाहेर काढून शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात आणले. तसेच एस टी मधील दीपक दिलीप पाटील याला देखील मुक्का मार लागल्याने उपचारासाठी पाठवण्यात आले. एकाच कुटुंबातील चौघे जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने अमळनेर येथील साखरपुडा रद्द करण्यात आला. माळीवाड्यातील नातेवाईकांनी एकच गर्दी करून हंबरडा फोडला होता. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , उदय बोरसे यांनी पंचनामा केला. चारचाकीतील चौघांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी अंबापिंप्री येथे करण्यात आले. तर निलेश याच्यावर मालपूर येथे व फाल्गुनी वर धरणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसऱ्या अपघातात पातोंड्याजवळ एक ठार
दरम्यान अमळनेर तालुक्यातील दहिवद – पातोंडा दरम्यान रोटवद येथील चेतन उर्फ विकी महाजन याचा मोटरसायकल एम एच १९ ओटी ५२४० वर अपघात झाल्याने ८ रोजी रात्री मृत्यू झाला असून तो रात्रभर रस्त्याच्या बाजूला पडला होता. तो अमळनेरहून रोटवदला जात होता. घरी आला नाही म्हणून रात्रभर त्याचा शोध घेण्यात आला. सकाळी लोकांनी पाहिल्यावर हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्याचेही शव अमळनेर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनसाठी आणण्यात आले. चेतन याची आई दिव्यांग असून त्याला लहान मुलगा आहे. दरम्यान हा अपघात कसा झाला हे समजू शकले नाही. पोलीस तपास करीत होते.




