
४तालुक्यातील ४३ टक्के ग्रामपंचायत मध्ये कर्तबगार महिलांचा सन्मान केलाच नाही…
अमळनेर : महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यात विधानपरिषद आचारसंहिता सुरू असल्याने अमळनेर तालुक्यातील तब्बल ४३ टक्के ग्रामपंचायतींनी पुरस्कार वितरण केले नाही.
शासनाने ९ मे २०२३ रोजी विशेष शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार दरवर्षी ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासंबंधी विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब यांची भेट घेऊन , अंमलबजावणीची मागणी केली होती. मात्र तालुक्यात ५७ टक्के ग्रामपंचायतीत या पुरस्कारांचे वितरण केले अशी प्राथमिक माहिती आहे. आचार संहितेत कोणतेही लाभाचे कृत्य करू नये असेही पत्रक असल्याने ग्रामसेवक गोंधळात होते त्यामुळे काही ग्रामपंचायतींनी पुरस्कार वितरण केले नाही. शासनाचा आदेश केवळ कागदावरच राहिला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. असे आरोप काही संघटनांमार्फत करण्यात आले.
जळगाव जिल्ह्याची विधानपरिषदेची आचार संहिता सुरू आहे त्यामुळे ग्रामसेवकांनी पुरस्कार वितरण केले नाहीत. आदल्या रात्री ऐनवेळी पुरस्कार वितरण करायला हरकत नाही असे आदेश सोशल मीडियावर आले ते काहींनी पाहिले म्हणून पुरस्कार देण्यात आले. मात्र काहींनी रात्री संदेश पाहिले नाहीत म्हणून पुरस्कार राहिले. अहवाल मागितला आहे. आचार संहिता संपल्यानन्तर पुरस्कार वितरित करण्यात येतील- एन आर पाटील ,गटविकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर
शासनाचा आदेश असतानाही कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यास ग्रामपंचायती टाळाटाळ करत असतील, तर हा शासनाचा अवमान आहे. ग्रामपंचायत मध्ये या आदेशाची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे. ज्यांनी कुचराई केली आहे, त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी धनगर समाज कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष डी.ए. धनगर यांनी केली आहे.



