
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील रहिवासी व सध्या पुणे येथील अतिरिक्त आयकर आयुक्त संदीपकुमार रतन साळुंखे यांची “आयकर आयुक्त” या पदावर पदोन्नती झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
संदीपकुमार साळुंखे यांनी सुरुवातीच्या काळात बजाज ऑटोचे सहायक व्यवस्थापक (पुणे) पद सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती, त्याचेच फलित म्हणून २००३ मध्ये त्यांची “एमपीएससी” द्वारे उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २००४ साली “यूपीएससी” द्वारे सहायक आयकर आयुक्त पदावर (आयआरएस) नियुक्ति झाली. त्यांनी नागपूर, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी संयुक्त आयकर आयुक्त व अपर आयकर आयुक्त म्हणून काम यशस्वीरीत्या सांभाळले आहे.त्यांना चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स (पुणे) यांच्याकडूनही तीन पुरस्कार मिळाले आहेत.त्याना नुकतेच “सीओइपी अभिमान पुरस्कारा”ने ही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या “धडपडणाऱ्या तरुणाईसाठी” या पहिल्या पुस्तकाने जळगाव जिल्ह्यातील ५२ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेऊन वाचन मोहिमेला प्रेरणा दिली. त्यांचे दुसरे पुस्तक “हम होंगे कामयाब” हे स्पर्धा परीक्षांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. “उठा, जागे वा” हे त्यांचे तिसरे पुस्तक त्यांच्या आध्यात्मिक अनुभवांवर आधारित आहे. “अंतरीचा दिवा” या पुस्तकाचे लिखाण केले आहे. श्री साळुंखे यांनी संपादन केलेले व त्यांच्या धर्मपत्नी डॉ. मोनाली साळुंखे यांनी लिहिलेले “सायन्स ऑल इन वन” हे पुस्तक ही संकल्पना स्पष्ट करणारे आहे. राज्य शासनाकडून ‘शिक्षण श्रेणीतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृती’ आणि कला प्रसारिणी सभा (पुणे) यांचा ‘कवी नारायण सुर्वे पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
मारवड येथील मूळ रहिवासी असून आपल्या मातृभूमीशी नाळ जुळवत त्यांनी रूट संकल्पना ग्रामीण भागात राबविली आहे. त्यांनी “मारवड परिसर विकास मंच” ची स्थापना करून अनेक शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या निवडीबद्दल उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुप, मारवड, पातोंडा, रणाईचे, कोळपिंप्री, दहिवद, कळमसरे,डांगरी या गावातील विविध परिसर विकास मंच व शिवशाही फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.







