
जोरदार धडकेनंतर दुचाकीला आग लागून झाली खाक…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील सावखेडा चौफुलीपासून काही अंतरावर सोमवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडाहुन नाशिककडे जाणारी बसला समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी बस डेपोची बस क्र. एमएच 40, वाय 5977 ही चोपडाहुन नाशिकच्या दिशेने निघाली होती. पारोळा तालुक्यातील टोळी येथील रहिवासी मनोज युवराज पाटील हा तरुण मोटारसायकलने चोपडाच्या दिशेने जात होता. सावखेडा चौफुली पासून काही अंतरावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पातोंडा रोडवर समोरून येणाऱ्या बसला मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला.अपघात इतका भीषण होता की मोटारसायकल शंभर मीटरपर्यंत फरफटत जाऊन तीचे पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी पडून मोटारसायकल जळून खाक झाली होती. बसमधील काही प्रवाशांच्या माहितीनुसार समोरून जलदगतीने येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला वाहकाने आरडाओरडा करून वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही मोटारसायकल बसला आदळली. घटना समजताच पातोंडा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी मयताच्या छातीवर असलेलं नाना नाव, मोबाईल क्रमांक व मोटारसायकल क्रमांकावरून मयताची ओळख पटवली होती. तेव्हा धरणगाव पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तासाभरात अमळनेर पोलीस दाखल होऊन घटनास्थळीचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी नेण्यात आले. तसेच अमळनेर आगारातील अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत तरुण हा एकुकता एक असल्याचे समजते.







