अमळनेर:- तालुक्यातील गडखांब येथे दि.१४ ऑगस्टl रोजी संध्याकाळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता.
एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ प्रकल्प व मूल्य साखळी विकसित करणे प्रकल्पांतर्गत आयोजित प्रशिक्षण वर्गाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश पाटील होते. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी भरत वारे उपस्थित होते. त्यांनी गटशेती, खरिप हंगाममधील प्रमुख पिकांचे उत्पादन वाढ तंत्रज्ञान, शेतकरी यांनी संघटित होऊन गटामार्फत सामूहिक निविष्ठा खरेदी करून खर्चाची बचत करणे व उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन केले. प्रधान मंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, शेतकरी आत्महत्या, सेंद्रिय शेती काळाची गरज, कृषिक ॲप डाऊनलोड करणे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी पर्यवेक्षक प्रविण पाटील यांनी जमिनीचे आरोग्य माती परीक्षण अहवालानुसार संतुलित खतांचा वापर, कापूस व मका पिकावरील कीड व रोग नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मान्यवरांचे शुभ हस्ते कापूस पिकांवरील बोंड अळी व मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रणबाबत घडी पत्रिकेचे विमोचन करून सर्व उपस्थित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. तसेच इफको कंपनीमार्फत रा.खताची बचत व कार्यक्षम वापर मार्फत नॅनो युरिया व सागरिका जैविक खतांचा वापर याविषयी कंपनीचे प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले व नॅनो खत तंत्रज्ञान प्रचार प्रसिद्धी रथाद्वारे गावातून फेरी काढून घडी पत्रिकेचे वाटप करण्यात आले. सरपंच पाटील यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले. सूत्र संचालन कृषी सहाय्यक अमोल कोठावदे यांनी केले.