
अमळनेर:- तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होत असून बळीराजा हवालदिल झाला आहे.
आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे पिंपळे खु,मंगरूळ, आर्डी, शिरसाळे परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सर्वाधिक फटका लाख मोलाच्या कापसाला बसत आहे. कापसाच्या बोंडांमधील सरकीला कोंब फुटत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून या भागात सततच्या पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सततच्या पावसामुळे कापूस तसे मक्याच्या कणसांना कोंब फुटले आहेत. यंदा निसर्गाने भरभरून दिले पण सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. नुकसानग्रस्तांना पंचनामे करून शासकीय मदत देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.







