कळमसरे शिवारात विहिरीत उडी टाकून संपविली जीवनयात्रा…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे शिवारात निम येथील ३० वर्षीय विवाहितेने ८ वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल ४ ऑक्टोबर रोजी घडली आहे.
काल संध्याकाळच्या सुमारास कळमसरे ते निम रस्त्यावर सबस्टेशन जवळ असलेल्या विहिरीत निम येथील समाधान जहांगीर कोळी याची पत्नी जयश्री समाधान कोळी व मुलगी नंदिनी समाधान कोळी या मायलेकीचा मृतदेह आढळून आला. सदर जयश्नी कोळी ही तीन वाजता कळमसरे बसस्टँड वर मुलीला घेवून बसली होती. मुलीला बिस्कीट व पाणीची बाटली घेवून पायी पायी निम गावाकडे रस्त्याकडे निघाली होती. दोघींच्या पायात चप्पल पण नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कळमसरे गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या विहिरीत सुरूवातीला जयश्नीने मुलीला लोटले व नंतर स्वतः उडी मारली असल्याची चर्चा आहे. जयश्नी व समाधान यांना अजून एक ४ वर्षाचा मुलगा असून तो मामाकडे जैनाबाद जळगाव येथे शिक्षणासाठी राहतो. नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी जयश्नीने मुलीला सोबत घेत आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदर विवाहितेचा पती समाधान जहांगीर कोळी हा रोजंदारीने दुसऱ्याकडे मोलमजूरी करत असून जयश्नीची सासू हिराबाई कोळी सप्तशृंगी गडावर देवदर्शनासाठी गेलेली होती. त्या दोन्ही मायलेकींचे मृतदेह ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. मुकेश साळुंखे करीत आहेत.