
दिवाळीपूर्वी मानधनवाढीचा निर्णय होण्याची शक्यता…

अमळनेर:- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१४ ऑक्टोंबर २०२२ रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींचे राज्यव्यापी लाक्षणिक धरणे आंदोलन संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आयोजित करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांनी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती.आय.ए. कुंदन यांना शिष्टमंडळाशी चर्चा करण्याबाबत सुचित केले. त्यानुसार सदर चर्चेत प्रस्तावित मानधनवाढीचा प्रस्ताव कॅबिनेट मिटींगमध्ये दिवाळीपूर्वी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव तयार असून त्यावर शासन सकारात्मक विचार करीत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन अद्यावत व जास्त क्षमतेचे मोबाईल लवकरच पुरविले जाणार आहेत. मदतनिस पात्र नसलेल्या रिक्त जागेवर मिनी अंगणवाडी सेविकांना सेविका म्हणून नियुक्ती देण्याबाबत लवकर शासन निर्णय होणार आहे. असे प्रधान सचिवांनी सांगितले. त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी येत्या काही दिवसांत आदेश काढण्यात येईल. नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना सुधारित घरभाडे लागू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. मोबाईल रिचार्ज ची रक्कम वाढविली जाईल. अतिरिक्त अंगणवाडी केंद्राचे काम करणाऱ्या सेविकांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याबाबत लवकर आदेश काढण्यात येईल. असे श्रीमती कुंदन यांनी शिष्टमंडळाला आश्र्वासित केले. शिष्टमंडळात मायाताई परमेश्वर, विमल तिसकर,नयना मराठे,पुष्पा परदेशी,तेजश्री गायकवाड,भारती घाटे, श्रीमती गोडसे यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी भागिदारी केली. धरणे आंदोलन यशस्वी झाल्याने आलेल्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.मायाताई परमेश्वर, युवराज बैसाणे, रामकृष्ण बी.पाटील, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर,अमोल बैसाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.







