
पातोंडा येथे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट…
संदीप लोहार (प्रतिनिधी)
पातोंडा ता.अमळनेर:- केंद्र सरकारच्या शक्ती व गती अभियान अंतर्गत अमळनेर चोपडा नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वे करण्यात आला. यावेळी अमळनेर येथील रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी एल बी सिंग वाहतुक निरीक्षक, राजेंद्र देसाई वाणिज्य निरीक्षक, राजेंद्र पाटील वरीष्ठ अनूभाग अभियंता कर्षण, ओमप्रकाश वरीष्ठ अनूभाग अभियंता कार्य, विजय पाटील वरीष्ठ अनूभाग अभियंता रेलपथ यांनी पातोंडा ग्राम पंचायतीसह ग्रामस्थांची भेट घेतली.
केंद्र सरकारने संपुर्ण भारतातील 50 हजार पेक्षा जास्त लोकवस्ती असणा-या शहरांना रेल्वेच्या ब्राॅडगेज लोहमार्गाने जोडण्याकरीता शक्ती व गती अभियानास सुरूवात केली असून जळगाव जिल्ह्यातील चोपडा या शहराचा त्यात सामावेश करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा सारखी इतर शहरे यापूर्वीच रेल्वेने जोडली गेली असल्याने सध्या चोपडा शहर हे 50 हजार पेक्षा जास्त लोकसंखेचे शहर असल्याने अमळनेर ते चोपडा रेल्वेमार्गासाठी सर्वे रेल्वे प्रशासनामार्फत सूरू करण्यात आला आहे. अमळनेर ते चोपडा दरम्यान असलेली व्यापारी दृष्ट्या व भौगोलिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांचा भेटी देऊन सर्वेक्षणाचे काम रेल्वे प्रशासना मार्फत सुरू असतांना या दरम्यान पातोंडा येथे भेटी दरम्यान अधिकाऱ्यांनी गावातील बॅंका, पतपेढी , सेवाभावी संस्था , प्राचीन मंदिरे , तिर्थक्षेत्र , चहार्डी साखर कारखाना , जिनींग व उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रस्तावित रेल्वे मार्ग महत्वाचा ठरेल व नवीन उद्योगधंदे वाढीस मदत होणार आहे. कसा प्रकारे विकास होईल. याबाबत माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी सरपंच भरत बिरारी, उपसरपंच नितीन पारधी, लिपीक राकेश पाटील, प्रा भुषण बिरारी , घनशाम पाटील , ईश्वर पाटील व अर्जून लोहार आदी ग्रामस्थ व ग्रा.प कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया –
” जळगाव जिल्ह्यात चोपडा, नंदूरबार जिल्ह्यात शहादा, नाशिक जिल्ह्यात संगमनेर, बुलढाणा जिल्ह्यात चिखली इ 50 हजार पेक्षाअधिक लोकसंख्या असणारी शहरे केंद्र सरकारच्या शक्ती व गती अभियान अंतर्गत रेल्वेने जोडली जाणार आहेत. यामुळे या शहरांचे सांस्कृतिक व व्यापारी महत्व वाढीस लागण्यास सहकार्य होईल.”
– राजेंद्र पाटील, वरिष्ठ अनूभाग अभियंता







