
राहत्या घरी केले विष प्राशन, उपचारादरम्यान मृत्यू…
संदिप लोहार (प्रतिनिधी)
पातोंडा ता.अमळनेर:- येथील शेतकरी राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ५० वर्ष) यांनी दि.8 रोजी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजेंद्र पाटील यास उपचाराकरीता धुळे येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यावर ९ रोजी सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले.
राजेंद्र पाटील हे दि.8 रोजी शेतात तुरीवर फवारणी करायला गेले होते. सायंकाळी शेतातून घरी परत आल्यानंतर त्यांनी फवारणीचे औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याच्या प्रयत्न केला. राजेंद्र पाटील यांच्याकडे स्वतःची दोन एकर व भाडेतत्वावर चार एकर जमीन होती. शेती करीता विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी कडून 35 ते 40 हजार पिक कर्ज, बचत गटाचे 75 हजार रूपये व मजूरी करीता 50 ते 60 रूपयांची हात उचल असे एकूण दिड लाखापर्यंत कर्ज होते. बेमोसमी पाऊस, उशीरा झालेली दुबार पेरणी व त्यामुळे उत्पन्नात होणारी घट लक्षात घेता कर्जाचा डोंगर चढता असल्याच्या विचारात त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होतांना दिसून येत आहे. राजेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन व मुलगी असा परीवार आहे.







