
अमळनेर पोलीसांनी दोन तासात आवळल्या मुसक्या…
अमळनेर:- शहरातील स्टेशन रोड भागात चाकुचा वार करून धाक दाखवत लुटमार केलेल्या आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी शंकर आधार पाटील दि. ०८ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास अमळनेर रेल्वे स्थानकावरुन त्यांचे मित्र नंदु गणेश चव्हाण यांच्या सह चहा पिवुन परत येत असतांना आरोपी नामे रमण बापु नामदास रा. मुठे चाळ याने फिर्यादी व त्यांचे मित्र यांना चाकुचा धाक दाखवुन तुमच्या खिश्यात किती पैसे आहेत, ते मला द्या नाहीतर मी तुला चाकुने मारुन टाकेल असे बोलून फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडावर तसेच उजव्या पायाला वार करून जखमी केले व फिर्यादीच्या खिश्यातील ७८००/- रुपये बळजबरीने काढुन पळुन गेला म्हणुन अमळनेर पोलिसांत भा.द.वि. कलम ३९४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी नामे रमण बापु नामदास हा गुन्हा केल्यापासुन फरार झाला होता. पो. नि. विजय शिंदे यांना माहीती मिळाली की, आरोपी नामे रमण बापु नामदास हा अमळनेर रेल्वे स्टेशन परिसरात लपुन बसला आहे. त्यावरून पो. नि. शिंदे यांनी पोउनि विकास शिरोळे, सफौ. रामकृष्ण कुमावत, पोहेकाँ. किशोर पाटील, पोना. डॉ. शरद पाटील, पोना. दिपक माळी, पोना. रविंद्र पाटील, पोना. सिध्दांत सिसोदे, पोना. कैलास पवार यांचे पथक तयार करुन आरोपीस ताब्यात घेण्यासाठी रवाना केले. या पथकाने आरोपी रमण यास रेल्वे स्टेशन परिसरातून अत्यंत शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असुन त्यास गुन्ह्यांकामी अवघ्या दोन तासात अटक करण्यात आली आहे व नमुद गुन्ह्यांचा तपास सफौ. रामकृष्ण कुमावत करीत आहेत. आरोपी रमण बापु नामदास याच्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात यापुर्वी देखील भा.द.वि. कलम ३९४ प्रमाणे, भा.द.वि. कलम ३९४, ५०६, ४२७ प्रमाणे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर कामगिरीबद्दल अमळनेर पोलिसांचे कौतुक केले जात आहे.







