वाहन पलटी होऊन दोन तलाठी जखमी, गाडीच्या काचा फुटून ८० हजाराचे नुकसान…
अमळनेर:- अवैध गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी नियुक्त गस्तीवरील पथकाचे सरकारी वाहन दिनांक ९ रोजी रात्री ११ वाजता निघाले असता दिनांक १० च्या पहाटे तांदळी कळमसरे रस्त्यावर वळणावर महसूल कर्मचाऱ्यांसह पलटी होऊन दोन तलाठी जखमी झाले तर वाहनांच्या काचा फुटून टफ व दरवाजे असे एकूण ८० हजारांचे नुकसान झाल्याची घटना घडली असून याबाबत वाहन चालकाने पोलिसांत खबर दिली आहे.
तालुक्यातील तिन्ही बाजुंनी वाहणाऱ्या तापी ,पांझरा व बोरी नदीतून सात्री, शहापूर, भिलाली, पाडळसरे, तांदळी, मांडळ, बोहरे, मुडी, निम आदी ठिकाणी नदीपात्रातुन मोठ्या प्रमाणात वाळू, दगड हे गौण खनिजाची चोरी होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गस्ती व बैठे पथक नियुक्त करण्यात आले असून त्यातील गस्तीवरील पथकात मारवडचे तलाठी मनोहर भावसार, शहापूरचे तलाठी गौरव शिरसाठ, मंगरुळचे कोतवाल भटु भदाणे यांच्या टीमला तहसीलदार यांच्या बोलेरो क्रमांक एम एच-१९ सीव्हि-०४१८ या वाहनातून वाहन चालक दिलीप पाटील हे दिनांक ९ च्या रात्री ११ वाजता निघाले असता गस्तीवरून कळमसरे ते तांदळी रस्त्यावरील वळण रस्त्यावर अचानक कुत्रे गाडीच्या पुढे आल्याने त्यांना वाचवतांना चालकाने तातडीने ब्रेक लावून वाहन वळविले असता बोलेरो जागीच फिरून पल्टी होऊन दरवाजाच्या काचा फुटून टफ ही वाकले यामुळे तहसीलदार यांच्या वाहनाचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली असून वाहन चालक दिलीप पाटील यांनी सायंकाळी मारवड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. सुदैवाने या वाहनात तहसीलदार नव्हते मात्र तलाठी गौरव शिरसाठ व मनोहर भावसार किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.