सबगव्हाण येथील घटना, अकस्मात मृत्यूची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण पाडसे रस्त्यावरील रेल्वे बोगद्यावरून पडून ५३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काल २ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सबगव्हाण येथील रहिवासी बाळासाहेब जिजाबराव पाटील (वय ५३, व्यवसाय शेती) हे पाडसे रस्त्यावरील शेतात जात असताना चक्कर येवून खाली पडल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा मुलगा व इतर जण घटनास्थळी पोहचले. बाळासाहेब पाटील हे जमिनीवर उलट्या अवस्थेत पडले होते व काहीच हालचाल करत नसल्याने त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. योगेश रमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पो. हे. कॉ. किशोर पाटील पुढील तपास करीत आहेत.