
जि. प. शाळेला दिली 11 हजार किमतीची पाचशे पुस्तके भेट…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील रहिवासी कै. दिनकरराव भदाणे यांच्या स्मरणार्थ गंधमुक्तीच्या दिवशी भदाणे कुटुंबीयांनी लोकोपयोगी उपक्रम राबवत अनोखा पायंडा पाडला आहे.
मारवड येथील रहिवासी, समाजवादी विचारांचे नेते व पंचायत समितीचे माजी सभापती डॉ दिनकरराव रामदास पाटील यांचे वृद्धापकाळाने दिनांक १७ जानेवारी रोजी निधन झाले होते. त्यांचे सुपुत्र इंजि. विजय भदाणे (सा. बां. विभाग) व संजय भदाणे यांनी वडीलांच्या स्मरणार्थ काल २ फेब्रुवारी रोजी मारवड येथील जि .प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वाचनाची गोडी निर्माण व्हावी व अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी ११ हजार रुपये किमतीची पाचशे पुस्तके शाळेस भेट दिली. सदर साहित्य जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांकडे सुपूर्त करण्यात आले.
रिचार्ज शाफ्ट करून वाढवणार भूजल पातळी…
इंजि. विजय भदाणे यांनी यावेळी स्वखर्चाने १०० फूट खोल रिचार्ज शाफ्ट करण्याचा मानस व्यक्त केला असून त्याद्वारे गल्लीत सर्व पावसाचे पाणी त्यात जिरवणार आहेत. या उपक्रमामुळे गावाची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. इंजि. भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास मंचद्वारे शेतशिवारात रिचार्ज शाफ्ट करण्यात आले असून त्याद्वारे शिवाराची भुजलपातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कै. दिनकरराव भदाणे यांचा सामाजिक वारसा नेहमीच कृतीद्वारे जपल्याने व हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्याने भदाणे कुटुंबीयांचे गावपरिसरातून कौतुक होत आहे.




