
पोस्कोसह अन्य गुन्हे दाखल, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली रवानगी…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अत्याचार केल्याने मारवड पोलीस ठाण्यात पोस्कोसह विविध गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपीला पोलीस अटक केली आहे.
तालुक्यातील कळमसरे येथील अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील १६ वर्षे १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला त्यांच्या रखवालीतून दिनांक ५ रोजी फूस लावून पळवून नेल्याने मारवड पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन दिवसांत पोलिसांनी मुलीला शोधून काढले व तिची जळगाव येथील सुधारगृहात रवानगी केली होती. तेथे पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार एपीआय जयेश खलाने यांनी व पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांनी तपास चक्रे फिरवून पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अत्याचार केल्याने अमळनेर येथील २० वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. तपासाअंती दिनांक १० रोजी मारवड पोलीस ठाण्यात आरोपी निखिल संतोष चौधरी (वय २०) राहणार बाहेरपुरा अमळनेर यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांच्या रखवालीतून फूस लावून पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी विविध दोन कलमान्वये तर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याचे विविध तीन कलम व अनुसूचित जाती जमाती अधिनियम १९८९ च्या विविध तीन अशा एकूण आठ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. त्यास सायंकाळी अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.







