मुलीच्या जबाबावरून तरुणास केली अटक, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील अंतुर्ली येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला तीन महिन्यांपूर्वी पळवून नेणारा तरुण तिच्या सख्या मावशीचा मुलगा निघाला असून मारवड पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून धुळे जिल्ह्यातील चिंचवार येथील तरुणावर बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार अटक केली आहे.
दिनांक ४ मार्च रोजी अंतुर्ली येथील एका मजूर महिलेची अल्पवयीन मुलगी सकाळी सहा वाजेपुर्वी राहत्या घरातून गायब झाल्याने मारवड पोलिसात फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी आणि मुलगी धुळे येथे एमआयडीसी मध्ये वास्तव्यास असल्याचे समजले. तांत्रिक माहितीच्या आधारे हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, मुकेश साळुंखे, उज्वल पाटील यांनी आरोपी आणि मुलीला ताब्यात घेऊन मारवड पोलीस स्टेशनला आणले. मुलीला पळवून नेणार आरोपी हिरालाल सोमनाथ मोरे (वय २३) रा चिंचवार जिल्हा धुळे हा मुलीचा मावसभाऊच असल्याचे समजले व त्याने ३ मार्च रोजी सदर मुलीला मोटरसायकलवरून पळवून नेल्याचे कबूल केले. महिला कॉन्स्टेबल रेखा ईशी व मारवड येथील प्रतिष्ठित महिलेच्या समक्ष अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आला. तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तरुणीचा जबाबावरून आरोपी विरुद्ध अपहरण सह भादवि कलम ३७६ व बालकांचा लैंगिक अत्याचार पॉक्सो कायद्याचे कलम वाढवून त्याला अटक करण्यात आली आहे. मुलीची जळगाव येथे महिला बाल सुधारगृहात रवाना करण्यात आली आहे.